
धानोरा : तालुक्यातील कन्हेली येथे पारंपरिक ‘झाडापापडा इलाखा महाग्रामसभा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित ३७ गावांच्या महाग्रामसभेत आदिवासी समाजाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संपूर्ण परिसरात घरगुती दारू गाळण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत सर्व गावांनी तसा ठराव संमत केला आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी धानोरा पंचायत समितीच्या माजी सभापती रामेश्वरी नरोटे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन कन्हेलीचे झूरु पाटील गावडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, दुर्गापूरचे सरपंच परमेश्वर गावडे, माजी इलाखा प्रमुख राणू गावडे, इलाखा पाटील मैनु धूर्वे, झाडापापडाचे जमीनदार गणेश पवार आणि नरेश मोहुर्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन, १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि ‘भूमकाल दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांच्या निमित्ताने परिसरातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ३७ गावांची महाग्रामसभा बोलावण्यात आली होती. या सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी समाजाने व्यसनमुक्तीच्या दिशेने घेतलेला पुढाकार. सभेमध्ये उपस्थित ३७ गावांच्या प्रतिनिधींनी सखोल चर्चा करून, भावी पिढीला वाचवण्यासाठी गावात घरगुती दारू तयार करणे आणि विकणे यावर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. सभेला उपस्थित ‘मुक्तीपथ’चे भास्कर कड्यामी यांनी अवैध आणि घरगुती दारूमुळे आदिवासी समाजावर होणारे दुष्परिणाम विशद केले. “युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवल्याशिवाय आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही,” असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
या ऐतिहासिक बैठकीला ३७ गावांतील गाव पुजारी, पाटील, ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, सदस्य आणि गावांतील महिला, पुरुष, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.



