गडचिरोलीविदर्भ

शासनसेवेत समाविष्ट नक्षलपीडित कुटुंबांतील उमेदवारांशी मुख्य सचिवांनी साधला संवाद

जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि ‘CIIIT’ केंद्राची केली प्रत्यक्ष पाहणी

गडचिरोली : नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी नुकतेच शासन सेवेत सावावून घेण्यात आलेल्या उमेदवारांशी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संवाद साधला. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या सुविधा निर्माण करणाऱ्या इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर तसेच गरजू रुग्णांना तातडीची मदत देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला काल भेट देवून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

नक्षलवादी हिंसाचारात कुटुंबातील व्यक्ती गमावलेल्या २९ तरुणांना १ जानेवारी २०२६ रोजी शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर नियुक्त करण्यात आले आहे. या उमेदवारांची मुख्य सचिवांनी आस्थेने विचारपूस केली. “कुटुंबात कोण आहे? सध्याची परिस्थिती काय आहे?” अशा प्रश्नांमधून त्यांनी उमेदवारांशी संवेदनशील संवाद साधला. केवळ नोकरीवर समाधान न मानता पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी तरुणांना दिला.

मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला आकस्मिक भेट दिली. रुग्णांना मिळणारी आर्थिक मदत, निधी वितरणाची प्रक्रिया आणि योजनेची पारदर्शकता त्यांनी तपासून पाहिली. “कोणताही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहू नये आणि मानवी दृष्टिकोनातून त्यांना वेळेत मदत मिळावी,” अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

गोंडवाना विद्यापीठ परिसरातील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT) येथे भेट देऊन त्यांनी आधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेले संगणकीय प्रकल्प त्यांनी स्वतः पाहून प्रशिक्षणाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी या रोजगारक्षम कौशल्यांचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ. मनोहर मडावी तसेच जिल्हा समन्वयक हर्षाली नैताम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button