
कुरखेडा : तालुक्यातील गांगोली येथील रहिवासी आनंदराव देऊजी मसराम (वय ६०) यांचा सायकल अपघातात मृत्यू झाला. ही घटना कढोली तलावावरील पुलावर मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव मसराम हे आपल्या सायकलवरून गांगोलीहून कढोलीकडे जात होते. कढोली तलावावरील पुलावरून जात असताना, सायकलवरील त्यांचा तोल गेला आणि ते सायकलसह थेट खाली कोसळले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मसराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनीही या अपघाताबाबत हळहळ व्यक्त केली असून, पुलाच्या संरक्षक उपाययोजनांची मागणीही जोर धरू लागली आहे.



