
पोलीस निरीक्षक पर्वते यांनी सायकलने भ्रमण करत दिला आरोग्याचा संदेश
गोंदिया : वाढत्या आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी आणि नागरिकांना शारीरिक सुदृढतेसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने, गोंदिया शहरात स्थापन झालेल्या ‘सायकलिंग संडे ग्रुप’ने रविवारी आपल्या सायकलिंग उपक्रमाचे ४०० आठवडे पूर्ण केले. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी स्वतः सहभाग घेतला आणि नागरिकांना आरोग्याबाबत सजग राहण्याचा सामाजिक संदेश दिला.
कामाच्या व्यस्ततेमुळे व्यायाम व सकाळचे फिरणे जमत नसलेल्या नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. हा ग्रुप २०१७ पासून दर रविवारी २० ते २५ किलोमीटर सायकलिंग करत असून, ४०० आठवडे सातत्याने हा उपक्रम राबवत आहे. या ग्रुपमध्ये लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक भाग घेत असून, ‘शारीरिक सुदृढता’ राखण्याचा मार्ग अनेकांना मिळाला आहे.
छोट्या स्वरूपात सुरू झालेला हा ग्रुप आज गोंदियात एका मोठ्या चळवळीत रूपांतरित झाला आहे. परिसरातील नागरिकांनी ग्रुपचे अभिनंदन केले. ग्रुपने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपले शरीर सुदृढ राखण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस सायकलचा वापर करावा, जेणेकरून कामाच्या व्यस्ततेतूनही शारीरिक सुदृढता राखण्यास मोलाची मदत होईल.
यावेळी सायकलिंग संडे ग्रुपचे अध्यक्ष मंजू कटरे, सचिव रवी सपाटे, कोषाध्यक्ष विजय येडे, संयोजक नरेंद्र बेलगे व दिपाली वाढई, मुन्नालाल यादव, भगीरथ जीवनी, प्रविण हालानी, निखिल रत्नाकर, राजू सोनवणे, गोपाल रहांगडाले, रोमी गुलाटी, शुभम भीमटे, उदयभान निर्वाण, उमेश माधवानी, डॉ. प्रेमकुमार बघेले, तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



