
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत
गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव आणि कर्तव्यपरता विकसित करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक घनश्याम वाळके होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.संदीप कोटांगले, प्रा.गजानन ढोले, देवेंद्र म्हशाखेत्री, गजानन अनमुलवार आणि संतोष कुळमेथे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानचे प्रास्ताविक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. प्रसंगी अध्यक्षीय भाषणात वाळके यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि लोकशाहीची मजबुती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी कायद्याचा आदर, राष्ट्रनिष्ठा आणि जबाबदार नागरिक होण्याची आवश्यकता स्पष्ट करून सांगितली. कार्यक्रमास अतिथींच्या मार्गदर्शनपर भाषणात संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, तसेच आजच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर विशेष प्रकाश टाकण्यात आला. संविधान हे देशाच्या प्रगतीचे मार्गदर्शक तत्त्व असून प्रत्येक नागरिकाला त्याचे पालन करणे ही राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषण सादरीकरणाद्वारे संविधानातील मूल्यांचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचा कॅप्टन आकाश टेकाम याने केले. संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



