गडचिरोलीविदर्भ

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न मार्गी लावा! – आ. सुधाकर अडबाले यांची मागणी

संचमान्यता दुरुस्ती आणि ‘बीएलओ‘ कामातून शिक्षकांची मुक्तता करण्याची मागणी; विनाकारण होणारी कारवाई थांबवण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन.

गडचिरोली : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवन येथे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. यावेळी संचमान्यता दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे समायोजन आणि शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे यांबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.

आमदार अडबाले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, १८ मार्च २०२६ च्या इतिवृत्तानुसार अधिकृत पत्र निर्गमित होईपर्यंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया तात्काळ स्थगित ठेवण्यात यावी. यावर सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण मंत्र्यांनी सचिवांना संपर्क साधून, आवश्यक पत्र काढण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयाचा दाखला देत, शिक्षकांना ‘बीएलओ’ (BLO) सारखी अशैक्षणिक कामे देऊ नयेत, अशी आग्रही मागणी आमदार अडबाले यांनी केली. बीएलओची कामे न स्वीकारणाऱ्या शिक्षकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये. चंद्रपूर येथे बीएलओ म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय त्रुटींमुळे संचमान्यतेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. या त्रुटी दूर करून संचमान्यता दुरुस्त करण्यात यावी, जेणेकरून शाळांचे व्यवस्थापन आणि शिक्षकांचे पदे सुरक्षित राहतील, याकडेही त्यांनी शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले.

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार दिलीप कडू आणि राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल भारसाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सुधाकर अडबाले यांच्या या पाठपुराव्यामुळे शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले असून, शिक्षक वर्तुळात या भेटीचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button