
बिरसा मुंडा जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे’ची भूमिका; केवळ उत्सव नको, परिवर्तन हवे
गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘जनजातीय गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर, आदिवासी समाजात जनजागृती, मानवी हक्कांचे संरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी ‘पंच परिवर्तनाची पंचसूत्री’ स्वीकारणे आवश्यक आहे, असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, जिल्हा शाखा, गडचिरोली तर्फे करण्यात आले आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.
डॉ. होळी यांनी सांगितले की, केवळ उत्सव साजरे करून समाजाचा विकास साध्य होणार नाही. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी विचार, कृती आणि परिवर्तनाची आवश्यकता आहे. आजही आदिवासी समाजात शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीतींचा प्रभाव दिसून येतो. समाजातील चांगल्या परंपरांचा वारसा जपण्यासाठी आणि आत्मनिर्भर समाज घडविण्यासाठी ही पंचसूत्री समाजात रुजविणे महत्त्वाचे आहे.
या पंचसूत्रीचा अंगीकार केल्यास आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत सामाजिक, नैतिक आणि मानसिक बदल घडवता येईल: कुटुंब प्रबोधन: कुटुंबातून शाश्वत आणि सक्षम समाज निर्माण करणे. पर्यावरण: व्यक्तीगत पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन. सामाजिक समरसता: परस्परपूरक जगण्याचा विषय व्हावा आणि स्नेहमय सामाजिक संबंध जोपासणे, तसेच सामाजिक व व्यक्तीगत जीवनातील भेदभाव संपविणे. नागरी कर्तव्य: देशभक्तीसोबत सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे. स्व-जागृती: स्व-भाषा, स्व-संस्कृती, स्व-देशी, स्वतःच्या परंपरा स्वीकारून त्याला विकसित करणे.
बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ही पंचसूत्री प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प परिषदेने केला आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभर विविध जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, जिल्हा उपाध्यक्ष वामन जुनघरे, वडसा अध्यक्ष भूषण अलाने, महिला तालुका अध्यक्ष, गडचिरोली लिना कोकोडे, शहर अध्यक्ष निलेश आत्राम), जिल्हा अध्यक्ष महिला शाखा पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव महिला शाखा विद्या दुग्गा आणि शहर उपाध्यक्ष श्याम सालामे आदी उपस्थित होते.



