
निकालानंतरच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल; रोंघा परिसरात हळहळ
तुमसर : निकालाच्या विवंचनेतून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील रोंघा येथे उघडकीस आली. १२ वीच्या निकालात अपेक्षित यश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून नावेल होलाराम खंडाते (वय १८) या तरुणाने २ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नावेल खंडाते हा १२ वीचा विद्यार्थी होता. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्याला अपयश आले, ज्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अखेर याच तणावातून त्याने गावाजवळील शेतशिवारात असलेल्या एका करंजीच्या झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. नावेलचे वडील गावाचे माजी उपसरपंच आहेत. एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण मुलाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नावेलच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ठाणेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश बांते करत आहेत.



