
पुलखल येथील घटना ; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
गडचिरोली : जिल्हास्थळापासून 6 किमी अंतरावर असलेल्या पुलखल येथील शेतशिवारात अज्ञात इसमाने एका शेतकऱ्याचे धानाचे पुंजणे आग लावून जाळून खाक केल्याची घटना शुक्रवारी (दि.29) सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यात राकेश पाल (महाजन) या शेतकऱ्याचे दोन एकर शेतातील धान जळून खाक झाले.
पुलखल येथील शेतकरी राकेश पाल (महाजन) यांनी दरवर्षीप्रमाणे दोन एकर शेतात जडप्रजातीच्या धानाची लागवड केली होती. धानाची कापणी होऊन पुंजणे शेतातच रचण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास अज्ञात इसमाने पुंजण्याला आग लावली. शेतमालकासह ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठत आग विझविण्याचा प्रयत्न केला. याची माहिती तत्काळ गडचिरोली नगर परिषद प्रशासनाला देत अग्निशमन वाहन पाचारण करण्यात आले. संबंधित पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत पुंजण्यातील अर्धेअधिक धान जळून खाक झाले. यात शेतकरी राकेश महाजन यांचे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून मौका तपासणी करीत पंचनामा केला. प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.



