
कडधान्य खरेदीत मालाचा पुरवठा न करता घोटाळा ; चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर: म्यानमार आणि सिंगापूर येथील एका कंपनीच्या संचालकांनी नागपुरातील एका व्यावसायिक कंपनीची तब्बल १८ कोटी ३९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कडधान्य खरेदीसाठी आगाऊ रक्कम घेऊनही मालाचा पुरवठा न केल्याने नागपुरातील पगारिया लिमिटेड या कंपनीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाराद्वारी, कापसी, पारडी येथील रहिवासी असलेले अंकित उज्ज्वलकुमार पगारिया (३१) हे पगारिया ओव्हरसिज प्रायव्हेट लिमिटेड तसेच पगारिया फूड लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक आहेत. इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील उंटखाना, प्लॉट नंबर २१ येथे त्यांचे कार्यालय आहे.
शरद जैन नावाच्या एका दलालाने (ब्रोकर) अंकित पगारिया यांची म्यानमार आणि सिंगापूर येथील पीएल ग्लोबल इम्पेक्स आणि पीटीई लिमिटेड या कंपन्यांच्या संचालकांशी ओळख करून दिली होती. २०२४ मध्ये अंकित पगारिया यांनी आरोपींच्या कंपनीला २ हजार टन काळे उडीदची ऑर्डर दिली. या बदल्यात त्यांनी आरोपींच्या खात्यात १८ कोटी ३९ लाख रुपये जमा केले. मात्र, ही रक्कम घेऊनही आरोपींनी मालाचा पुरवठा केला नाही आणि त्यांची फसवणूक केली.
या फसवणुकीप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी विवेक दिनोदिया, संगीता दिनोदिया, नरेश दिनोदिया आणि अनिल व्यास (सर्व सिंगापूर) या आरोपी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल व्यास हा आरोपींच्या कंपनीत कार्यरत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



