
तब्बल ५ कोटी रुपयांची मालमत्ता हडपल्याचा पत्रकार परिषदेत आरोप ; पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल
राजुरा : राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी सुमनताई मामुलकर (वय ८४) यांची तब्बल ५ कोटी रुपयांची मालमत्ता फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुमनताई यांनी आपल्या सख्ख्या बहिणीच्या मुलासह पाच जणांविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. राजकारणातील एका प्रतिष्ठित कुटुंबातच हा फसवणुकीचा प्रकार घडल्याने राजुरा शहरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजुरा येथे आयोजित एका जाहीर पत्रकार परिषदेत सुमनताई मामुलकर यांनी आपली आपबिती मांडली. पतीच्या निधनानंतर वयोमानानुसार प्रकृती ठीक नसल्याने, घरात मदतीसाठी त्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते आणि त्याची पत्नी शिल्पा भुते यांना घरी राहण्यास बोलावले होते. सुरुवातीला काळजीवाहू बनलेल्या या दाम्पत्याने हळूहळू घरातील सर्व आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि सुमनताई यांच्या पेन्शनची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या ताब्यात घेतली.
सुमनताई यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मे २०२५ रोजी आरोपींनी “तुम्हाला एक जमीन खरेदी करायची आहे,” असे खोटे सांगून सुमनताई यांना राजुरा येथील दुय्यम निबंधक (रजिस्ट्रार) कार्यालयात नेले. तेथे अभिजित भुते व शिल्पा भुते यांच्यासह आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर हे आधीच हजर होते.
जमीन खरेदीचा बहाणा करून संशयितांनी सुमनताई यांच्या नकळत त्यांच्याच नावावरील तब्बल ९ मालमत्तांचे तीन विक्रीखत आणि सहा बक्षिसपत्रे (गिफ्ट डीड) करून घेतले. या फसवणुकीच्या माध्यमातून अंतरगाव येथील शेती, सुबई येथील शेती व वसतिगृह, तसेच राजुरा शहरातील रामनगर कॉलनीतील राहते घर यासह इतर मोक्याच्या मालमत्ता आरोपींनी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हडप करण्यात आलेल्या या सर्व स्थावर मालमत्तेची अंदाजे किंमत ५ कोटी रुपयांच्या घरात आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ८४ वर्षीय सुमनताई मामुलकर यांना आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी सांगितले की, “मला अंधारात ठेवून, माझी दिशाभूल करून माझ्याच संपत्तीची कागदपत्रे नातेवाईकांनी लिहून घेतली आणि वयाच्या ८४ व्या वर्षी मला बेघर केले. माझी फसवणूक करणाऱ्या या नराधमांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि माझी हक्काची संपत्ती मला परत मिळवून द्यावी,” अशी भावनिक व न्यायाची मागणी त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी, यासाठी सुमनताई मामुलकर यांनी चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले असून, राजुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



