
मध्यस्थीने वाद मिटवून वेळेची बचत करण्यावर भर ; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजन
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे सोमवारी ग्राम पंचायत कार्यालय, दिभना (ता. जि. गडचिरोली) येथे महत्त्वपूर्ण कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना विविध कायदे, योजना आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात NALSA (Victims of Trafficking and Commercial Sexual Exploitation) Scheme, ADR Methods, Public Utility Services, LGBTQIA+ Community, Sexual Harassment of Women at Workplace, Victim Compensation Scheme, NALSA JAGRITI & SAMVAD Scheme-2025 आणि Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007 यासह १० महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
उप-मुख्य न्यायरक्षक ॲड. कु. एन. के. जुमनाके यांनी समाजातील महिलांची सुरक्षितता व गोपनियता, मध्यस्थी (ADR) व त्याचे फायदे तसेच कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर मार्गदर्शन केले. रिटेनर अधिवक्ता ॲड. श्री. ए. एम. अंजनकर यांनी बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना, NALSA जागृती व संवाद योजना आणि NALSA चा टोल फ्री क्रमांक १५१०० याबद्दल माहिती दिली.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी असलेले अं. पुं. खानोरकर (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) यांनी मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लोक अभिरक्षक कार्यालय, गडचिरोली मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. खानोरकर यांनी पालक व जेष्ठ नागरिकांचे पालनपोषणाबाबत असलेला कायदा (Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007) समजावून सांगितला. तसेच, वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले वाद मध्यस्थीने कसे मिटवता येतात व मध्यस्थीमुळे वेळेची व पैशाची कशी बचत होते, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास दिभना येथील गावकरी, महिला व वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम पंचायत दिभना येथील सचिव कु. व्ही. व्ही. देशमुख यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.



