क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

अवैध दारूसह ६७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपींना अटक

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २९ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अवैध दारू व चारचाकी वाहनासह ६७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे.

जितेंद्र शंकर लोहार (रा. येंगलखेडा, ता. कुरखेडा) आणि त्याचा साथीदार रोशन दुग्गा (रा. चिचेवाडा, ता. कुरखेडा) हे एमएच-१८-बी.झेड-७४७७ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पुराडा मार्गे अवैध दारूची वाहतूक करणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने हेटीनगर, पुराडा चौकात सापळा रचला. संशयित वाहन भरधाव वेगाने येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा आढळला. पोलिसांनी एकूण ८५ बॉक्स टँगो पंच देशी दारू (अंदाजे किंमत ६,८०,००० रुपये), ५६५ बॉक्स रॉकेट देशी दारू (अंदाजे किंमत ४५,२०,००० रुपये), चारचाकी आयशर वाहन (अंदाजे किंमत १५,००,००० रुपये) आणि दोन जुने मोबाईल फोन (अंदाजे किंमत २०,००० रुपये) असा एकूण ६७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पुराडा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७६/२०२५, कलम ६५ (अ), ९८ (२), ८३ महा. दा. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी जितेंद्र शंकर लोहार आणि रोशन दुग्गा यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि/रविंद्र म्हैसकर, पोस्टे पुराडा हे करीत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. समाधान दौड, पोस्टे पुराडाचे सपोनि. रविंद्र म्हैसकर, स्थागुशाचे पोहवा सुधाकर दंडीकवार, पोअं प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, चापोअं/माणिक निसार यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button