
गडचिरोली : जिल्हयातील दुर्गम व आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना आधुनिकतेची जोड देत विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि भविष्यमुखी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘शाळा परिवर्तन प्रकल्प’ (School Transformation Project) वेगाने राबविण्यात येत आहे. शासन आणि खासगी भागीदारीतून (PPP) राबविला जाणारा हा प्रकल्प गडचिरोलीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरत आहे.
या प्रकल्पाची सुरुवात ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारातून झाली. प्रकल्पासाठी NPCI कडून अर्थसहाय्य दिले जात असून, लर्निंग लिंक्स फाउंडेशन प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहे. या प्रक्रियेत जिल्हा परिषद, शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांचा उत्तम समन्वय दिसून येत आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये (२०२१ ते २०२५) १२५ शाळांचा विकास पूर्ण झाला आहे. सध्या पाचव्या टप्प्यात अतिरिक्त ५० शाळांचा समावेश करण्यात आला असून, आता एकूण १७५ शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. प्रभावित तालुके: आरमोरी, आहेरी, चामोर्शी, वडसा (देसाईगंज), धानोरा, गडचिरोली, कोरची आणि कुरखेडा.
या प्रकल्पांतर्गत केवळ इमारतीची रंगरंगोटी न करता शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जात आहे: स्मार्ट एज्युकेशन: तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा आणि गणित संच. इमारतच शिकण्याचे साधन: ‘बिल्डिंग अॅज लर्निंग एड’ (BaLA) संकल्पनेतून शैक्षणिक भित्तीचित्रे. पायाभूत सुविधा: आधुनिक ग्रंथालये, शुद्ध पिण्याचे पाणी, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि क्रीडा साधने. क्षमता बांधणी: शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचे आरोग्य उपक्रम आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण.
दुर्गम भागातील गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक समुदाय आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सक्रिय सहभागामुळे हा प्रकल्प लोकचळवळ बनत आहे. गडचिरोलीतील हा शैक्षणिक कायापालट आता राज्याच्या इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श व प्रेरणादायी ठरत आहे.



