१४ आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वी; पुन्हा फुलणार संसाराची स्वप्ने

गडचिरोली पोलीस दलाचा पुढाकार, ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आतापर्यंत ५० जणांना लाभ ; दलममधील सक्तीच्या नसबंदीनंतर आता मुख्य प्रवाहात अपत्यप्राप्तीचा मार्ग मोकळा
गडचिरोली : माओवादी चळवळीच्या हिंसक मार्गाचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या आत्मसमर्पितांना आता खऱ्या अर्थाने ‘कौटुंबिक सुख’ लाभणार आहे. गडचिरोली पोलीस दल आणि सर्च फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग (Vasectomy Reversal) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये गडचिरोलीतील १३ आणि गोंदियातील एका सदस्याचा समावेश असून, २४ मार्च रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
माओवादी दलममध्ये कार्यरत असताना सदस्यांना कौटुंबिक जबाबदारी टाळण्यासाठी नसबंदी करण्यास सक्ती केली जाते. मात्र, आत्मसमर्पण केल्यानंतर या सदस्यांना अपत्यप्राप्तीची ओढ असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला. चातगाव येथील सर्च फाऊंडेशनच्या ‘मां दंतेश्वरी रुग्णालयात’ २१ मार्च रोजी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सदर यशस्वी शस्त्रक्रिया सर्च फाऊंडेशन, गडचिरोलीचे पद्मश्री डॉ. अभय बंग, पद्मश्री डॉ. राणी बंग, जिल्हा शल्य चिकित्सकडॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लीलावती रुग्णालय, मुंबई येथील डॉ. श्रीरंग पुरोहित, डॉ. सुशिल नेहेते, डॉ. लीना जैन, डॉ. वर्षा बारई, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोलीचे डॉ. नागसेन साखरे यांनी पार पाडल्या. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकूण ५० जणांची ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यापैकी १३ जोडप्यांना प्रत्यक्ष अपत्यप्राप्ती झाली आहे, जे या उपक्रमाचे सर्वात मोठे यश मानले जाते.
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आत्मसमर्पितांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत: रोजगार: ७२ आत्मसमर्पितांना लॉयड्स मेटल्समध्ये कौशल्य प्रशिक्षण व नोकरी उपलब्ध. गृहप्रकल्प: ४ स्वतंत्र रो-हाऊसचे काम प्रगतीपथावर असून शबरी व प्रधानमंत्री आवास योजनेतून घरांची निर्मिती. ओळखपत्रे: आधार, पॅन, रेशन आणि जॉब कार्ड मिळवून देणे. आरोग्य: डोळ्यांच्या उपचारासाठी ‘ऑपरेशन रोशनी’ आणि सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन.
हा महत्त्वाचा बदल घडवून आणण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल व संतोष कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे आत्मसमर्पित माओवाद्यांना समाजात मानाने आणि आनंदाने जगण्याची नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेतील हे एक अत्यंत संवेदनशील आणि क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.



