
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील राजोली रेती घाटावर झालेल्या युवकाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या हत्याकांडाची जलदगतीने, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
घटनेच्या वेळी रेती घाटावर उपस्थित असलेले मालक, त्यांचे भागीदार (पार्टनर), सुरक्षारक्षक, कर्मचारी आणि वाहनचालक यांची कसून चौकशी व्हावी. घटनेच्या वेळी कोण-कोण उपस्थित होते, त्यांची या गुन्ह्यात काय भूमिका होती आणि त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती देऊन पुरावे जपण्याची जबाबदारी पार पाडली की नाही, याचा तपास होणे गरजेचे आहे. रेती घाटावरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते का, याची पडताळणी करून सर्व फुटेज तात्काळ जप्त करावेत आणि त्याची फॉरेन्सिक तपासणी करून संशयितांचा शोध घ्यावा. अशी मागणी डॉ. होळी यांनी केली आहे.
“या प्रकरणाच्या तपासाबाबत जनतेमध्ये विविध शंका-कुशंका उपस्थित होत आहेत. रेती घाटाशी संबंधित व्यक्तींची किंवा इतर कोणाची यात मिलीभगत होती का, तसेच तपासात कोणताही राजकीय किंवा अनुचित हस्तक्षेप होत आहे का, याचाही निष्पक्ष तपास झाला पाहिजे. कोणत्याही संशयिताला घाईघाईने ‘क्लीन चिट’ देण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहाव्यात.” असेही डॉ. देवराव होळी यांनी म्हटले आहे.
मृत युवकाच्या कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि कोणताही दबाव न बाळगता पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी डॉ. होळी यांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणात ढिलाई दाखवल्यास भाजपा आदिवासी मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.



