गडचिरोलीविदर्भ

पळसगाव (नवेझरी) येथे अवैध दारूविक्रीला बसणार चाप; ग्रामसभेत ५० हजार रुपयांच्या दंडाचा निर्णय

गडचिरोली : ग्रामीण भागातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील पळसगाव (नवेझरी) येथील ग्रामस्थांनी पाऊल उचलले आहे. २० मार्च रोजी सरपंच दिगंबर कोकोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत गावातील महिलांच्या पुढाकारातून संपूर्ण दारूविक्रीबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

गावात जवळपास सहा दारूविक्रिते सक्रिय असल्याने व्यसन वाढले आहे. घरातील कर्ता पुरुष कमावलेले पैसे दारूवर उडवत असल्याने महिलाना त्रास होत आहे. त्यामुळे गावातील वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुक्तीपथ च्या मार्गदर्शनाखाली गाव सभा घेण्यात आली. यावेळी मुक्तीपथ अभियानाच्या प्रभारी संघटक शारदा मेश्राम यांनी गावविकासात दारूविक्रीमुळे निर्माण होणारे अडथळे, बेरोजगारी, महिलाना त्रास व आरोग्याच्या समस्या विषद करीत दारूमुक्त झाल्याशिवाय गावाचा विकास अशक्य असल्याचे सांगितले.  दरम्यान, ग्रामसभेने दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर केला. अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी कठोर आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. गावात दारू विक्री किंवा अवैध साठा आढळल्यास संबंधितांना ५०,००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दारूबंदी मोहिमेत सक्रिय असलेल्या महिला समितीला जर कोणी शिवीगाळ केली किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला, तर अशा व्यक्तींना थेट पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला जाईल. उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.

गावातील महिलांनी या मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदवला असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यसनमुक्ती हेच पहिले पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आहे. सभेला प्रामुख्याने सरपंच दिगंबर कोकोडे, उपसरपंच गणेश हलामी, पोलीस पाटील शीतल सुरेश आडे, गाव संघटनेच्या अध्यक्षा अर्चना हुडी आणि उपाध्यक्षा सरिता कुमरे, निरंजना मडावी, बाबुराव मडावी, हेमंत मडावी, वनिता हलामी, मनिषा नैताम, रूपाली उसेंडी, मोनिका मडावी, तानाबाई कुमरे, सविता कुमरे, गीता हलामी, सुनंदा मडावी, कविता मरापे, योगिता आडे, ताराबाई हुरा ममता हलामी, स्पार्क कार्यकर्ता अतुल पोरटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button