गडचिरोलीविदर्भ

दारूविक्री केल्यास ढाबा बंद करू – गीताली येथील महिलांचा इशारा

मुलचेरा : तालुक्यातील गीताली येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ढाब्याच्या नावाखाली अवैध दारूविक्री सुरु असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिला व ग्रामस्थांनी अहिंसक कृती करीत दारू पकडली. त्यानंतर बैठकीचे आयोजन करून विक्रेत्यांना अवैध व्यवसाय बंद करा, अन्यथा ढाबा बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

गीताली येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटन व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आपल्या गावाला अवैध दारूविक्रीमुक्त केले. परंतु, मुख्य मार्गावर काही ढाबा व्यवसायिकांनी चोरटया मार्गाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. या बाबतची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार गाव संघटनेच्या महिलांसह ग्रामस्थांनी कृती करून ढाब्याची पाहणी केली असता, दोन व्यवसायिकांकडे दारूविक्री होताना आढळून आली. यावेळी संबंधितांचा संपूर्ण मुद्देमाल पकडून विक्रेत्यांविरोधात निर्णय घेण्यासाठी तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावालगतच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या ढाबा व्यवसायाच्या आड सुरु असलेली दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. सोबतच यानंतर दारूविक्री करताना आढळून आल्यास ग्रामसभेच्या ठरावानुसार नियम लागू करून दंडात्मक तसेच पोलिस कारवाई देखील करण्यात येईल. ग्रामसभेच्या निर्णयाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यवसायिकांचा ढाबा देखील बंद करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ढाबा व्यवसायिकांनी बैठकीच्या निर्णयाचे पालन करीत आजपासून दारूविक्रीचा अवैध व्यवसाय करणार नाही असा तोंडी संकल्प घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button