क्राईमभंडाराविदर्भ

अश्लील व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींशी चाळे ; संतप्त महिलांनी शिक्षकाला भरचौकात चपलेने बदडले

वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील संतापजनक प्रकार ; शिक्षकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

भंडारा : ज्या शाळेला आपण ‘विद्यामंदिर’ संबोधतो, त्याच मंदिरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका नराधम शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत लैंगिक विकृतीचा कळस गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण गाव पेटून उठले असून, संतप्त महिला आणि पालकांनी संबंधित शिक्षकाला भरचौकात चपलांनी झोडपून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले.

अनिल जगन राठोड (वय ५४) असे या नराधम आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मागील पाच वर्षांपासून तो या शाळेत कार्यरत होता. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, अनिल राठोड हा वर्ग सुरू असताना मुलांना वर्गाबाहेर काढायचा आणि मुलींना वर्गात ठेवून दारे बंद करून घ्यायचा. त्यानंतर तो विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यासोबत विकृत चाळे करायचा. मागील जुलै २०२५ पासून हा निंदनीय प्रकार सुरू होता.

हा नराधम शिक्षक विद्यार्थिनींना धमकावण्यातही मागे नव्हता. “हा प्रकार घरी सांगितल्यास मारहाण करेन, परीक्षेत नापास करेन किंवा शाळेतून नाव कमी करेन,” अशी धमकी तो मुलींना द्यायचा. मात्र, हा छळ असह्य झाल्याने अखेर काही विद्यार्थिनींनी हिंमत करून पालकांना या कृत्याची माहिती दिली आणि या पाशवी प्रकाराचा पर्दाफाश झाला.

ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच संतप्त पालकांनी आणि गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली. काही महिलांनी त्याला शाळेबाहेर ओढून आणले आणि जाब विचारला. आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला भरचौकात चपलांनी चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनिल राठोड याला ताब्यात घेतले. पीडित मुलींच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, अशा विकृत मानसिकतेच्या शिक्षकावर कठोरतम कारवाई करून त्याला सेवेतून कायमचे बडतर्फ करावे, अशी मागणी वडेगाववासीयांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button