
शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाच्या नेतृत्वाखाली आयोजन; युवकांना राष्ट्रीय एकता व विकासाचा संदेश
गोंदिया : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, जिल्हा प्रशासन, ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय (अर्जुनी मोरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ‘सरदार @ १५०’ एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या पदयात्रेचा शुभारंभ पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले आणि एनएसएस जिल्हा समन्वयक डॉ. बबन मेश्राम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. ही पदयात्रा दुर्गा चौक, भारत माता चौक, बस स्टॅण्ड मार्गे जाऊन परत महाविद्यालयात येऊन संपन्न झाली. शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयासह विविध महाविद्यालयांतील एकूण ५०० हून अधिक युवक-युवतींनी या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. मोहुर्ले यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकीकरणाच्या कार्याची उजळणी केली आणि युवकांना एकता, विकास व सेवेचा संदेश दिला. यावेळी उपस्थित युवकांना राष्ट्रीय एकता शपथ, आत्मनिर्भर भारत संकल्प व नशामुक्ती प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम व पथनाट्याचेही आयोजन करण्यात आले. या पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रा. अंकित नाकाडे, प्रा. पंकज उके व रासेयो स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



