क्राईमगडचिरोलीविदर्भ

‘हनी ट्रॅप’! तरुणाला बेदम मारहाण करून पाजले विष; प्रेयसीसह तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचा गुन्हा

४ लाख उकळल्यानंतरही १५ लाखांची मागणी ; आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न फसला; मृत्यूशी झुंज देणारा तरुण शुद्धीवर आल्याने सत्य उघड

आरमोरी : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणे, त्याच्याकडून लाखो रुपये उकळणे आणि शेवटी मागणी पूर्ण न झाल्याने त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असा एक अंगावर शहारे आणणारा प्रकार आरमोरी शहरात उघडकीस आला आहे. आरोपींनी संबंधित २६ वर्षीय तरुणाला बळजबरीने कीटकनाशक पाजल्याची खळबळजनक घटना ३ एप्रिल रोजी समोर आली असून, आरमोरी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या दोन साथीदारांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील पीडित तरुणाचे एका २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, या तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या प्रियकराची एन्ट्री झाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचा गैरफायदा घेत तरुणीच्या दोन साथीदारांनी मध्यस्थीचा आव आणला. “तुझे चॅटिंग आणि खाजगी माहिती आमच्याकडे आहे, ती व्हायरल करून तुझे कुटुंब उद्ध्वस्त करू,” अशी धमकी देत या त्रिकुटाने ब्लॅकमेलिंग सुरू केले. बदनामीच्या भीतीपोटी पीडित तरुणाने आतापर्यंत सुमारे ४ लाख रुपये या टोळीला दिले होते.

एवढी मोठी रक्कम देऊनही आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी तरुणाकडे आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. १३ मार्च २०२६ रोजी पीडित तरुण ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला वाटेत गाठले. त्याला बेदम मारहाण करून बळजबरीने शेतीसाठी वापरले जाणारे कीटकनाशक पाजले. तरुण निपचित पडल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपींनी या घटनेला ‘आत्महत्येचे’ स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तरुणाला विष पाजल्यानंतर त्याच्याच मोबाईलवरून वडिलांना “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो तरुणीच्या मोबाईलवर पाठवून ‘प्रेमातून त्याने आत्महत्या केली’ असा बनाव रचण्यात आला. विषप्राशनामुळे प्रकृती खालावल्याने तरुणाला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३ एप्रिल रोजी तो शुद्धीवर आला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी एक २३ वर्षीय तरुणी, नितीन जोध, राजू अंबानी (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीने अन्य कुणाला असेच जाळ्यात ओढले आहे का, याचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे आरमोरी शहरात खळबळ उडाली असून, सुशिक्षित तरुणांनी सोशल मीडिया आणि अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button