‘त्या’ बालकांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाची समिती गठीत

गडचिरोली : वेळेवर वैद्यकीय उपचार न घेतल्याने पोटच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी गमवावे लागण्याची दुर्दैवी वेळ अहेरी तालुक्यातल्या येरागड्डा गावातील वेलादी दाम्पत्यावर आली. त्यात कहर म्हणजे त्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटरची पायपीट करत आपले गाव गाठले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या घटनेला अनेक कंगोरे असले तरी त्या बालकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यात कोणती मानवी चूक तर नाही ना, हे तपासण्यासाठी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी चौकशी समिती गठीत केली.
विशेष म्हणजे पायपीट करत गावी नेण्यात आलेले दोन्ही बालकांचे मृतदेह आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या मदतीने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून गुरूवारी शवपरिक्षण करण्यात आले. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यासह चौकशी समितीच्या सदस्यांनी तातडीने जिमलगट्टा गाठून सर्व घटनाक्रम जाणून घेतला. मुळात त्या दाम्पत्याला रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध करून देण्याअगोदरच, शवपरीक्षण टाळण्यासाठी त्या दाम्पत्याने मुलांचे मृतदेह घेऊन गावाची वाट धरल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
डॅाक्टरपेक्षा गावातल्या पुजाऱ्यावर, मांत्रिकावर जास्त विश्वास ठेवणे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अंगलट येत आहे. त्यातही काही तासात मृत्यू ओढवण्यामागे पुजाऱ्याने दिलेल्या जडीबुटीचा दुष्परिणाम तर नाही ना, किंवा इतर कोणता आजार आहे हेसुद्धा स्पष्ट होणे गरजेचे आहे. शवपरिक्षणाचा अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे.



