
आ. सुधीर मुनगंटीवार, आ. बंटी भांगडिया आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती स्टॉलला भेट; ‘डेमो किट’द्वारे स्मार्ट मीटरचे स्पष्टीकरण
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे (महावितरण) संपूर्ण राज्यामध्ये वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, अचूक, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील अर्धवट आणि चुकीच्या माहितीमुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून, ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’च्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
मुल व चिमूर येथील तहसील कार्यालयांमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरादरम्यान महावितरणतर्फे विशेष माहिती स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलवर ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यपद्धती, वैशिष्ट्ये आणि फायदे समजावून सांगण्यासाठी स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक (Demo Kit) ठेवण्यात आले होते. दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसह अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दारिद्र्यरेषेखालील (BPL) घटकांसाठी असलेल्या रूफटॉप सोलर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथील महावितरणच्या स्टॉलला भेट देऊन स्मार्ट योजना व स्मार्ट मीटरची माहिती घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्मार्ट मीटरच्या पारदर्शकतेबाबत व ग्राहकांना होणाऱ्या फायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच चिमूर येथील शिबिरात चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पंत यांनी माहिती स्टॉलला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रोत्साहित केले.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांचा दैनंदिन वीज वापर थेट समजण्यास मदत होणार असून, वीज क्षेत्रात आधुनिकता आणणारे हे एक महत्त्वपूर्ण साधन असल्याचे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.



