गोंदियाविदर्भ

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत ‘तंबाखूमुक्ती’ची शपथ

तंबाखूचे दुष्परिणाम, कायद्याची तरतूद आणि व्यसनमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांवर भर

गोंदिया : जिल्हा परिषदेत जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. तंबाखूच्या सेवनामुळे मानवी शरीरातील केसांपासून पायांपर्यंतच्या सर्वच अवयवांवर घातक परिणाम होतात, ज्यामुळे कर्करोग, हृदयरोग, यकृताचे आजार, मोतीबिंदू आणि फुफ्फुसाचे विविध विकार जडतात, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी दिली.

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात ‘तंबाखू मुक्त’ दिनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिलीप खोटेले, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल आणि जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात हे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे सुमारे दीडशे अधिकारी व कर्मचारी या शपथाग्रहण समारंभात सहभागी झाले होते.

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी तंबाखू ही जीवघेणी असल्याचे अधोरेखित केले. “तंबाखू खाणाऱ्यांना दंडासह सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “तंबाखूमुक्तीची केवळ शपथ घेऊन चालणार नाही, तर प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन हे व्यसन सोडण्यासाठी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.”

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधीर महामुनी यांनी शालेय मुलांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही सध्याची सर्वात मोठी चिंता असल्याचे मत व्यक्त केले. “हे प्रमाण कमी करण्यासाठी शालेय शिक्षक आणि पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे ते म्हणाले. “पालकांनी आपल्या मुलांसमोर स्वतः व्यसन न करता, व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, मुख कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होत असल्याचे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या २००४ च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांमुळे होतो. हे प्रमाण कमी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जिल्हा मौखिक तज्ज्ञ डॉ. अनिल आटे यांनी भारतात तंबाखूचे सेवन दोन प्रकारे केले जाते हे स्पष्ट केले: धूरसहित (ज्यात बिडी, सिगारेट, हुक्का इत्यादींचा समावेश होतो) आणि धूररहित (ज्यात गुटखा, पान, नस तपकीर, खैनी इत्यादींचा समावेश होतो). व्यसनाची प्रमुख कारणे देताना त्यांनी मित्रांची संगत व दबाव, चित्रपट किंवा इतर माध्यमांमधून होणाऱ्या जाहिराती, तंबाखू उत्पादन कंपन्यांकडून केले जाणारे विविध प्रकारचे प्रसार, आनंद मिळवण्याचा उद्देश, कंटाळा व कामाचा ताण कमी करणे आणि मानसिक तणाव कमी करणे ही असू शकतात, अशी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी केले, तर डॉ. अनिल आटे यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button