गडचिरोलीविदर्भ

चातगाव पोलीस मदत केंद्राला ‘पोलीस स्टेशन’चा दर्जा

२६ गावांना मिळणार तात्काळ मदत व सुरक्षा ; एसपी नीलोत्पल यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. धानोरा तालुक्यातील पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत असलेल्या पोलीस मदत केंद्र (PMC) चातगावला आता पोलीस स्टेशन (Police Station) म्हणून शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर रोजी नवीन पोलीस स्टेशन चातगावचे उद्घाटन पार पडले.

सन २०१० साली चातगाव येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. आता पोलीस स्टेशनमध्ये रुपांतर झाल्यामुळे या भागातील गुन्हेगारी आणि माओवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याकरिता प्रभावीपणे मदत होणार आहे. नवीन पोलीस स्टेशन चातगाव अंतर्गत २६ गावे जोडली जाणार आहेत. या २६ गावांमधील नागरिकांना आता तात्काळ मदत व सुरक्षा उपलब्ध होणार आहे. तसेच, नागरिकांसोबत पोलिसांचा संवाद वाढून या भागात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

उद्घाटनादरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोस्टे चातगाव अंतर्गत असलेल्या सुरक्षा गार्ड मोर्चा, पोलीस अधिकारी व अंमलदारांचे बेरेक, एसआरपीएफ अंमलदार बेरेंक इत्यादींची पाहणी केली. ते म्हणाले, “पोलीस मदत केंद्र चातगावचे पोलीस स्टेशनमध्ये रुपांतर झाल्याने नागरिकांना मदत मिळणे, तक्रार नोंदविणे सोपे होणार आहे. सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीएनएस, ई-साक्ष आणि नवीन कायद्यांचा कौशल्याने वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. नागरिकांसोबत सामंजस्यपूर्ण वागणूक ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.”

यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी कॅम्प कारवाफा जगदिश पांडे आणि पोस्टे चातगावचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चैतन्य काटकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button