
कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजन ; कमी पावसातील पीक नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
भंडारा : हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात ‘कृषी दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, कमी पावसातील पीक नियोजन आणि अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती एकनाथ फेंडर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अर्थ व आरोग्य समितीचे सभापती आनंद मलेवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर बांधकाम व शिक्षण समितीचे सभापती नरेश ईश्वरकर, कृषी समिती सदस्या पुजाताई हजारे, जिल्हा परिषद सदस्या लता नरुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने, प्रकल्प संचालक (आत्मा) उर्मिला चिखले, ‘स्मार्ट’चे नोडल अधिकारी सचिन खैरनार तसेच जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. व्ही. ए. गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हास्तरीय खरीप पीक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून कृषी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एकनाथ शेंडे, शास्त्री गोमासे, देवराम फंदे, शिवलाल कोरचे, प्रकाश मडावी, अनुरूप उईके यागुणवंत शेतकऱ्यांचा या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रगतशील शेतकरी देवराम फंदे यांनी भात पिकाचे विक्रमी उत्पादन वाढविण्याबाबतचे आपले अभ्यासपूर्ण अनुभव इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी कमी पावसाच्या परिस्थितीतही योग्य आणि नियोजनबद्ध शेती पद्धतीचा अवलंब करून कशी उत्पादनवाढ साध्य करता येते, याचे गणित मांडले. कृषी विज्ञान केंद्र (साकोली) येथील वरिष्ठ भात पैदासकार डॉ. मिलिंद पी. मेश्राम यांनी कमी पावसाच्या संकटात तग धरणाऱ्या आणि चांगल्या उत्पादन देणाऱ्या भात वाणांची तांत्रिक माहिती दिली. वरिष्ठ शास्त्रज्ञ उषा डोंगरवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बियाण्यांची उगवणक्षमता स्वतः तपासूनच शेतात पेरणी करावी.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी विकास अधिकारी व्ही. यू. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन कृषी दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. शेलार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एस. एस. लांजेवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद भंडारा तसेच पंचायत समिती भंडारा येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.



