
सालेकसा पोलिसांची कारवाई
गोंदिया : दोन मालवाहक वाहनांमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 56 गोवंशांची सालेकसा पोलिसांनी सोमवारी (दि. 16) सुटका केली. तसेच दोन वाहन जप्त करण्यात आले असून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सालेकसा पोलिस ठाण्याचे पथक सोमवारी गस्तीवर असताना कवडी जंगल परिसरातून जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी कवडी जंगलात शोधमोहीम राबविली. दरम्यान एमएच-36/एए- 3498 आणि एमएच-40/सीडी-4906 क्रमांकाच्या दोन पिकअप वाहनांमध्ये एकूण 56 नग गोवंश कोंबलेले दिसून आले. जनावरांसाठी चारा आणि पाण्याचीही व्यवस्था केली नव्हती.
दरम्यान पोलिसांनी दोन वाहने आणि जनावरे असा एकूण 11 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आकाश श्रीराम गायधने (24, रा. सिल्ली, ता. जि. भंडारा), मारोती कवडू गभणे (26, रा. सिल्ली, ता. जि. भंडारा) आणि विजय मांगीलाल पटिले (36, रा. पानगाव, ता. सालेकसा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या निर्देशान्वये पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार डोंगरे, पोलिस शिपाई अजय इंगळे, विकास वेदक, रामप्रसाद मेंढके यांनी केली.



