
कुरिअरद्वारे मागवलेल्या चांदीची चोरी, पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून केला पर्दाफाश
गोंदिया : शहरातील एका प्रतिष्ठित ज्वेलर्सच्या दुकानातून ३८ लाख रुपयांची ३० किलो चांदी चोरीला गेली होती. गोंदिया पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केली आणि चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या थरारक कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोंदिया येथील प्रसिद्ध ‘रोहित ज्वेलर्स’ यांनी एका मोबाइल ॲपवरून राजकोटच्या दुकानातून ५० किलो चांदीची ऑर्डर दिली होती. ही चांदी कुरिअरमार्फत दोन पार्सलमध्ये पाठवण्यात आली. पहिले २० किलो चांदीचे पार्सल दुकानदाराला मिळाले, पण ३० किलो वजनाचे दुसरे पार्सल काही केल्या पोहोचले नाही. कुरिअर कंपनीकडे चौकशी केली असता, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दुकानदाराने तात्काळ गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरीचा कोणताही थेट पुरावा नसतानाही, गोंदिया शहर पोलिसांचे डीबी पथक (DB Squad) तात्काळ कामाला लागले. त्यांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासणीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर पोलिसांना जिया अली सय्यद नावाच्या संशयित आरोपीला अटक करण्यात यश आले.
चौकशीदरम्यान, त्याने कुरिअर पार्सलची अफरातफर केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या घरातून चोरीला गेलेल्या चांदीचे संपूर्ण पार्सल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेडही जप्त केली. या कामगिरीने केवळ ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळवला नाही, तर गोंदिया पोलिसांच्या कार्यक्षमतेचा आणि जलद कारवाईचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक केले आहे.



