
गडचिरोली : हळदवाही-रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रातील वीज, शेती आणि महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित समस्यांबाबत भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांच्या तक्रारींचा पाढा वाचत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
क्षेत्रातील अनेक गावांमध्ये वस्त्यांचा विस्तार झाला असून, तिथे नवीन वीज खांबांची (Electric Poles) अत्यंत गरज आहे. अनेक ग्रामपंचायतींनी याबाबत रितसर प्रस्ताव सादर केले असूनही अद्याप वीज वितरण कंपनीकडून खांब लावण्यात आलेले नाहीत. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. आमदार महोदयांनी या प्रकरणात लक्ष घालून लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती सुरेश शहा यांनी केली.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर आपले धान विकले आहे, परंतु दीर्घकाळ लोटूनही त्यांना अद्याप धानाचे पैसे मिळाले नाहीत. खरीप हंगाम आणि घरगुती गरजांसाठी शेतकऱ्यांना पैशांची मोठी नड आहे. “मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे रखडलेले चुकारे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
मौजा रेगडी येथे नागरिकांच्या महसुली कामांसाठी तलाठ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत रेगडी स्वतंत्र कार्यालय (रूम) देण्यास तयार आहे. तरीही तिथे कामकाज सुरू होण्यात अडचणी येत आहेत. यावर ठोस निर्णय घेऊन महसूल प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी मागणी शहा यांनी केली.
या सर्व मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “शेतकऱ्यांचे पैसे आणि वीज खांबांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. तसेच तलाठी कार्यालयाबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरच निराकरण करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर सुरेश शहा यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या भेटीमुळे क्षेत्रातील रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.



