
सडक अर्जुनी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंडा येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविकांनी सामूहिक योग करून जनजागृती केली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक व त्यांचे फायदे समजावून सांगितले. आशा सेविका मीरा कोरे, रंजिता टेकाम, वर्षा तागडे, आशा नेवारे, मीना मेश्राम आणि प्रतिभा खोटेले यांनी सादर केलेले ‘योगकमळ’ विशेष आकर्षण ठरले.
या वर्षीच्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची थीम ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ अशी होती. या थीमच्या माध्यमातून निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ चाटे यांनी सांगितले की, आपले आरोग्य पृथ्वी ग्रहाच्या आरोग्याशी जोडलेले आहे. जर आपण आपल्या ग्रहाचे रक्षण केले नाही, तर आपण निरोगी राहू शकत नाही. हवा, पाणी आणि अन्न या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असल्याने पर्यावरणाचे संतुलन राखण्यात आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढवण्यात योगाची महत्त्वाची भूमिका आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत ठाकरे यांनी निरोगी शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, कर्करोग, मधुमेह आणि दमा यांसारख्या गंभीर आजारांपासून आराम मिळण्यासाठी उपचारांसोबत दररोज योग करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच हाडे मजबूत होण्यासही मदत होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा व्याप, वेळेचा अभाव, अनियमित जीवनशैली, फास्ट फूड, व्यायामाची कमतरता आणि मानसिक तणाव यांसारख्या विविध बाबींचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी भारताची प्राचीन योग विद्या अवलंबणे ही काळाची गरज बनली आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमिता नरडेले यांनी सांगितले. मन आणि शरीर आरोग्यमय ठेवायचे असेल, तर नियमित योग करणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
या योग शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. जगन्नाथ चाटे, डॉ. अमिता नरडेले, डॉ. सुशांत ठाकरे आणि आरोग्य सहायक इष्टामे यांच्यासह आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



