गडचिरोलीविदर्भ

शहरात घाणीचे साम्राज्य ; आरोग्य धोक्यात, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

देसाईगंज : अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या देसाईगंज शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहराच्या विविध वार्डांतील ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आणि सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी ही यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरत आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिग साचले असून, त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

देसाईगंज शहराची लोकसंख्या सुमारे ४५ हजारांच्या घरात आहे. या लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगार नियुक्त करणे आणि प्रत्येक वार्डात घंटागाड्या पोहोचवून कचरा जमा करणे आवश्यक होते. मात्र, अपुऱ्या सफाई कामगारांमुळे अनेक ठिकाणी केवळ थातूरमातूर सफाई केली जाते. अनेक भागांतील नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील अनेक फळ विक्रेते उरलेली आणि सडलेली फळे रस्त्याच्या कडेला कुठेही फेकून देत आहेत. या सडक्या फळांवर माशा घोंगावत असल्याने परिसरात साथीच्या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः आंबेडकर वार्डातील नगर परिषदेच्या शाळेजवळच सडकी फळे फेकली जात असल्याने, येथून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

देसाईगंज शहरातील अनेक वार्डांमध्ये पसरलेल्या या घाणीच्या साम्राज्याबाबत सफाई कामगार किंवा घंटागाडी चालकांना तोंडी सूचना देऊनही परिस्थितीत कोणताही सुधार झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील काही लोक अजूनही साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणीच आणखी कचरा आणून टाकत असल्याने कचऱ्याचे ढिग वाढत आहेत आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शहरातील विविध वार्डांतील साचलेल्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी देसाईगंज शहरवासियांनी मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जर प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही केली नाही, तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button