
आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; अतिक्रमितांचे पुनर्वसन आणि स्थानकांच्या आधुनिकीकरणावरही शिक्कामोर्तब.
नवी दिल्ली/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये लवकरच मोठी क्रांती होणार आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर यशस्वी चर्चा केली. या बैठकीत बल्लारशा ते मुंबई थेट रेल्वेगाडी सुरू करून तिला “ताडोबा एक्सप्रेस” असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आ. मुनगंटीवार यांनी मांडला, ज्याला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जागतिक ओळखीला साजेशी रेल्वे सेवा असावी, या उद्देशाने बल्लारशा-मुंबई ‘ताडोबा एक्सप्रेस’ची मागणी लावून धरण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी ही गाडी सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस सुरू करण्यास संमती दिली असून, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच: चंद्रपूर-पुणे साप्ताहिक गाडी: आता आठवड्यातून तीन दिवस धावणार. गंगा-कावेरी एक्सप्रेस: ही गाडी आता दररोज धावण्याची शक्यता आहे. बल्लारपूर-अयोध्या: नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.
रेल्वे लाईन लगतच्या अतिक्रमणांबाबत आ. मुनगंटीवार यांनी अत्यंत ठाम भूमिका मांडली. “योग्य पुनर्वसनाशिवाय कोणावरही अन्याय होऊ नये,” या त्यांच्या मागणीवर रेल्वेमंत्र्यांनी अतिक्रमितांना मोबदला आणि पुनर्वसन देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, बाबुपेठ-सास्ती प्रकल्पातील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देशही दिले.
‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत चंद्रपूर आणि बल्लारशा स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम रखडल्याचे आ. मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यामुळे प्रवाशांना लवकरच विमानतळाच्या धर्तीवर आधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहेत.
मारोडा: येथे पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी अंडरब्रिजऐवजी ‘रोड ओव्हर ब्रिज’ (ROB) उभारण्याचा नवा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. नांदुरा स्थानक: श्री महाकाली मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हिसार, ओखा-दरभंगा, जोधपूर-बेंगळुरू आणि पुणे-काशी एक्सप्रेसला नांदुरा येथे थांबा देण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे.
या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ZRUCC सदस्य अजय दुबे आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या यशस्वी चर्चेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या मागण्या आता मार्गी लागणार आहेत.



