गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

जिल्ह्यातील आदिवासी युवकाची ‘आयपीएस’, ‘आयएएस’ला गवसणी

मूळच्या देसाईगंजमधील राहुल आत्राम याचे यूपीएससीत यश

गडचिरोली : ज्या आजोबांनी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज, आरमोरी पोलीस ठाण्यांमध्ये शिपाई म्हणून काम केले त्या आजोबाच्या नातवाने दोन वेळा युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आधी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) आणि आता आयएएसला (भारतीय प्रशासकीय सेवा) गवसणी घातली आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यातील एका आदिवासी युवकाचे हे यश जिल्ह्यासाठी अभिमानाचे ठरले आहे.

राहुल रमेश आत्राम असे त्या यशस्वी युवकाचे नाव आहे. काल जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेत राहुल यांनी 481 व्या रँकने हे यश गाठले. हे कुटुंब मूळचे देसाईगंज येथील आहेत. पोलीस शिपाई असलेल्या आजोबांनी त्यांच्या मुलाला अर्थात रमेश आत्राम यांना चांगले शिक्षण दिले. त्यामुळे रमेश आत्राम हे समाजकल्याण अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रूजू झाले. त्यानंतर सहायक आयुक्त, संशोधन अधिकारी, प्रादेशिक उपायुक्त अशा विविध पदांवर काम करत सहआयुक्त म्हणून ते निवृत्त झाले. त्यांचा जास्तीत जास्त कार्यकाळ नागपुरात गेल्याने त्यांचे पूत्र राहुल यांचे शिक्षण नागपुरातच झाले. नागपूरच्या डॅा.आंबेडकर कॅालेजमधून बारावी केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडगपूर येथून बी.टेक., एम.टेक.ची पदवी घेतली. पण भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची त्यांची ईच्छा कायम होती.

कोरोनाकाळात त्यांनी युपीएससी परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आणि 2023 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचा भारतीय पोलीस सेवेत नंबर लागला. त्याचे प्रशिक्षण सुरू असतानाच राहुल यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा परीक्षा दिली आणि पु्न्हा त्यांना हे यश लाभले. यावेळी आयएएस कॅडर मिळेल असा विश्वास त्यांना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button