गडचिरोलीविदर्भ

धानोरा तालुक्यात वीजपुरवठ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त

वारंवार वीज खंडित, वाढीव बिले आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संताप

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या खंडामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एका वर्षात महिन्यातून जवळपास ३० वेळा वीज खंडित होत असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धानोरा तालुक्यात चातगाव ते धानोरा आणि धानोरा ते मूरूमगाव या मुख्य मार्गांवर वारंवार ब्रेकडाऊन होत आहे. गडचिरोली ते मूरूमगावपर्यंतची ११ के.व्ही. ची लाईन महिन्यातून अनेकदा बंद पडते. या गंभीर समस्येवर विद्युत विभाग कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकिकडे वीजपुरवठा खंडित होत असताना, दुसरीकडे नागरिकांना मोठ्या रकमेची वीजबिले मिळत आहेत. वेळेवर मीटर रीडिंग न घेतल्यामुळे सरासरी बिले पाठवली जात आहेत, ज्यात सुरक्षा ठेवीची (Security Deposit) रक्कम वाढवून आकारली जात आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

याव्यतिरिक्त, मूरूमगाव येथील सबस्टेशनमध्ये नियमित कनिष्ठ विद्युत अभियंत्याची नेमणूक करण्याची मागणीही जोर धरत आहे. विद्युत वितरण कंपनीतील काही कर्मचाऱ्यांवर मादक पदार्थांचे सेवन करत असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे, ज्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धानोरा तालुक्यातील जनतेने या सर्व समस्यांवर तात्काळ लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा आणि वाढीव वीजबिलांचा आढावा घ्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button