गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात ‘तंबाखूमुक्त युवा’ अभियानाचा धडाका! ; ११ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे यशस्वी समुपदेशन

‘तंबाखू मुक्त शाळा‘ उपक्रमांतर्गत ६२ शाळांमध्ये जनजागृती ; आरोग्य विभागाचा व्यसनाधीनतेविरुद्ध एल्गार

गोंदिया : देशाची भावी पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकू नये, यासाठी गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाने ‘तंबाखू मुक्त युवा अभियान ३.०’ अंतर्गत जिल्ह्यात प्रभावी मोहीम राबविली आहे. वर्ष २०२५ मध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ६२ शाळांमध्ये तंबाखूमुक्तीचा जागर करण्यात आला असून, तब्बल ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत सखोल समुपदेशन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत के.टी.एस. शासकीय सामान्य रुग्णालय येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे विशेष पथक कार्यरत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायती आणि शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

शाळा व शाळा परिसर शंभर टक्के तंबाखूमुक्त राहावा, यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाने संयुक्त पाऊल उचलले आहे. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही छुप्या पद्धतीने होणाऱ्या विक्रीला रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शाळांच्या आवारात जनजागृतीचे फलक लावण्यात आले असून शिक्षकांमार्फत सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जात आहे.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ माहिती न देता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे. डॉ. अनिल आटे, डॉ. अमोल राठोड, यश जयस्वाल आणि विवेकानंद कोरे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची मौखिक तपासणी केली जात आहे. मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यांनी माहिती दिली की, तंबाखूविरोधी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून टिफिन बॅग, वॉटर बॉटल, लंच बॉक्स आणि शैक्षणिक साहित्य वितरित केले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या संध्या संभरकर यांच्यामार्फत विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली जात आहे.

तंबाखूमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार बळावतात. त्यामुळेच जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड आणि त्यांच्या टीमने आठही तालुक्यांतील शाळांना भेटी देऊन समुपदेशन व उपचारांवर भर दिला आहे. “शिक्षकांचे सहकार्य आणि आरोग्य विभागाची मेहनत यामुळे जिल्ह्याला तंबाखूमुक्त करण्याच्या मोहिमेला यश मिळत आहे,” असे मत डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button