गोंदियाविदर्भ

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ विचारधारेच्या प्रसारासाठी गोंदियात नियोजन

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक ; युवक व विद्यार्थ्यांपर्यंत विचार पोहोचवण्याचे उद्दिष्ट

गोंदिया : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन या लोककल्याणकारी विचारसरणीचा प्रभाव राज्यातील युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी “एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव समिती” स्थापन करण्यात आली आहे. या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यामध्ये विचारधारेच्या प्रसारासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीला शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाचे प्राचार्य, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, सहायक आयुक्त सामाजिक न्याय विभाग, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राचे रा. ना. माटे, कानतोडे आणि उमेश आगासे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत एकात्म मानव दर्शन विचारधारेचा युवकांपर्यंत प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि वादविवाद स्पर्धांचे आयोजन करून गुणवंत स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्याचे नियोजन आहे. एकपात्री प्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार प्रभावीपणे सादर करण्यात येणार आहे. प्रचार आणि प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येईल. एकात्म मानव दर्शन या विचारसरणीवर आधारित पुस्तके प्रकाशित करून ती शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, कामगार आणि इतर घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या उपक्रमांच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ या सर्वसमावेशक आणि लोककल्याणकारी विचारधारेची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button