गोंदियाविदर्भ

आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचा आढावा

कन्हाळगावात लसीकरण सत्राची पाहणी; प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांना भेट देऊन सुधारणांच्या सूचना

गोंदिया : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन आरोग्य विषयक कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी करत अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.

डॉ. शंभरकर यांनी सर्वप्रथम कन्हाळगाव येथील नियमित लसीकरण सत्राला भेट दिली. येथे त्यांनी बालकांना दिल्या जाणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाची पाहणी केली. एईएफआय किटची उपलब्धता, लसीकरण बॅनर, लाभार्थी यादीची पडताळणी तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी लसीकरणाच्या प्रगतीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर प्रशिक्षण केंद्राचे डॉ. नितीन कापसे, अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वर किरसान, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निखिल लंजे, तालुका आरोग्य सहायक सुरेश धुर्वे यांच्यासह अनेक आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

त्यानंतर डॉ. शंभरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव, प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव आणि आयुष्मान आरोग्य मंदिर प्रतापगड येथेही भेट दिली. या भेटींदरम्यान त्यांनी औषध भांडार, लसीकरण कक्ष, शीतसाखळी गृह व त्यातील उपकरणे, प्रसूती गृह, शल्यचिकित्सा गृह, प्रयोगशाळा आणि आंतररुग्ण वॉर्ड यांसारख्या विविध विभागांची पाहणी केली.

डॉ. शंभरकर यांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच, आरोग्य संस्थांच्या आतील आणि बाहेरील परिसरातील स्वच्छतेची पाहणी करून लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची नियमित स्वच्छता राखणे. सर्व कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे बंधनकारक. बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) वेळेत रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा पुरवणे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटींचे नियोजन करणे. पर्यवेक्षकांनी उपकेंद्रांना भेटी देऊन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेणे. मुख्यालय सोडण्यापूर्वी ‘हलचल रजिस्टर’वर नोंदी करणे अनिवार्य. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करणे. कर्मचाऱ्यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. जैविक घन कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे. जनआरोग्य समितीच्या सभा नियमित घेणे. कुपोषित अंगणवाडीतील बालकांची तपासणी करून त्यांना श्रेणीनुसार वर्गीकरण करणे आणि आवश्यक असल्यास अर्जुनी मोरगाव येथील एन.आर.सी. केंद्रावर भर्ती करण्याच्या सूचना. टेलिकन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत योग्य नियोजन करणे. गरोदर मातांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात नियमित सेवा देणे. पत्ता सिझन स्थलांतरित व्यक्ती आणि आश्रमशाळेतील मुलांची आरडीके किटने मलेरियाबाबत तपासणी करणे. अंगणवाडीतील बालकांची नियमित तपासणी करणे. आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे. अशा सूचना डॉ. शंभरकर यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button