आरोग्यगडचिरोलीविदर्भ

दामरंचा येथे मोफत आरोग्य शिबिर; ९० नागरिकांवर उपचार

पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे. गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जून रोजी अहेरी उपविभागातील दामरंचा येथील आठवडी बाजार परिसरात एका भव्य ‘मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामुळे दामरंचा परिसरातील दुर्गम गावांमधील नागरिकांना हक्काची आरोग्य सुविधा घरापाशीच उपलब्ध झाली.

या विशेष आरोग्य मेळाव्यादरम्यान दामरंचा परिसरातील सुमारे ९० नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांबाबत सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच, दुर्गम भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध हंगामी आजार, साथीचे रोग आणि कुपोषण यासारख्या गंभीर पोषण समस्यांविषयी वैद्यकीय पथकाद्वारे विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरामध्ये २ रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर आढळल्याने, त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी व तपासणीसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे. सदर शिबिरात पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन गिरसावळे, डॉ. रोशनी किरंगे, संतोष पवार आणि भास्कर जवंजाळ यांच्या नेतृत्वातील चमूने रुग्णांची तपासणी केली.

केवळ कायदा व सुव्यवस्थाच नव्हे, तर दुर्गम भागातील जनतेची सेवा करण्यात गडचिरोली पोलीस दल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. सन २०२१ पासून आजतागायत पोलीस दलाने केलेल्या लोककल्याणकारी कामांची आकडेवारी थक्क करणारी आहे: आरोग्य मेळावे: एकूण २०२ यशस्वी आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४२,५०० पेक्षा अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे. रक्तदान शिबिरे: एकूण ०५ मोठ्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून पोलीस दलाने ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन करून जीवनदात्याची भूमिका बजावली आहे. ऑपरेशन रोशनी: या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १,४१२ गरजू अंध व वृद्ध नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्यात आली आहे.

आरोग्य शिबिरासोबतच, गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना देशासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तसेच, नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या ‘सी-६०’ पथकाच्या शौर्याबद्दल आणि पोलिसांच्या नागरी कृती उपक्रमांबद्दल आठवडी बाजारात आलेल्या शेकडो नागरिकांना विविध माहितीपूर्ण बॅनर्सच्या माध्यमातून अवगत करून व्यापक जनजागृती करण्यात आली.

सदर आरोग्य शिबिराचे यशस्वी नियोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा राहुल मडावी यांच्या नेतृत्वात उप-पोलीस स्टेशन दामरंचाचे पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज बाराते, पोउपनि अनिकेत संकपाळ आणि सर्व पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button