
१५० व्या जयंती वर्षाचे औचित्य : आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन करण्याचा संकल्प
कुरखेडा : तालुक्यातील देऊळगाव (शिरपूर) येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने नवनिर्मित ‘बिरसा मुंडा गोटुल’ इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा गोटुल समिती (देऊळगाव/मतदोला/अन्नतांडी/शिरपूर बेलगाव) यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरांचे दर्शन घडले. १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून उभारण्यात आलेले हे गोटुल परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे केंद्र ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या लोकार्पण सोहळ्याला आमदार रामदास मसराम, माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, कर सल्लागार श्रीकांत नागिलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौसिक, प्रा. अनिल होळी, प्रा. दौलत धुर्वे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार गजबे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जल-जंगल-जमीन आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचा गौरव केला. “गोटुल ही केवळ इमारत नसून ती आदिवासी संस्कृतीच्या संस्कारांची शाळा आहे. नवीन पिढीने भगवान बिरसा मुंडांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा. अनिल होळी आणि प्रा. दौलत धुर्वे यांनीही बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
देऊळगाव, मतदोला, अन्नतांडी आणि शिरपूर बेलगाव परिसरातील आदिवासी बांधव, माता-भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. गोटुल समितीच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे चोख नियोजन केले. लोकार्पणानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि बिरसा मुंडांच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.



