
जयनगर गावात ‘मुक्तिपथ‘चा दारूबंदीसाठी पुढाकार
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जयनगर गावाला अवैध दारूविक्रीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी मुक्तिपथ-शक्तिपथ संघटनेच्या महिलांनी कंबर कसली आहे. नुकतेच या महिलांनी तीन दारूविक्रेत्यांना दारूसह पोलिसांच्या स्वाधीन केल्याने इतर विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे.
जयनगरमध्ये मुक्तिपथ तालुका टीमच्या वतीने ‘सघन गाव भेट’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शक्तीपथ संघटनेच्या महिलांनी अवैध दारूविक्रीमुळे गावात निर्माण झालेल्या विविध समस्या मांडल्या. दारूमुळे कुटुंबात होणारी भांडणे, महिलांवर होणारे अत्याचार आणि मुलांच्या भवितव्यावर होणारे दुष्परिणाम यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या समस्यांमधून मुक्त होण्यासाठी मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे यांनी महिलांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले आणि त्यावरील उपाययोजना समजावून सांगितल्या.
मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करत सात दारू विक्रेत्यांच्या घरी शोध मोहीम राबवली. या शोधमोहिमेत तीन दारू विक्रेत्यांच्या घरी १५ लिटर दारू आणि दारू बनवण्याचे साहित्य आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. महिलांच्या या धडाकेबाज कृतीमुळे तीन विक्रेत्यांवर कारवाई झाल्याने इतर दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जयनगरमधील महिलांनी चामोर्शी पोलिसांकडे इतर दारूविक्रेत्यांवरही कारवाई करून गावाला अवैध दारूविक्रीमुक्त करण्याची मागणी केली आहे.
या मोहिमेत गावातील सुमारे ४० महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रकाश मंडल, सहदेव रिषभ मिस्त्री, नारायण किरण मंडल, निरपत सुरेश गाइन, सुचित्रा विश्वास, जयंती पाल यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



