
अपघातानंतर वाहन चालक फरार; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू
भंडारा : नेहमीप्रमाणे पत्नीसह सकाळी फिरायला जाणे एका कुटुंबासाठी काळ ठरले आहे. वरठी येथील सनफ्लॅग कंपनीचे कर्मचारी दीपक मुरलीधर तिवाडे (४५) यांचा भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (२२ एप्रिल) पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास वरठीलगतच्या राज्य महामार्गावर घडली. विशेष म्हणजे, ज्या कंपनीत ते कामाला होते, त्याच कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वरठी येथील गांधी वॉर्डातील रहिवासी असलेले दीपक तिवाडे बुधवारी पहाटे आपल्या पत्नीसह फिरायला गेले होते. घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या सनफ्लॅग कंपनीच्या गेटजवळ ते पोहोचले असता, विरुद्ध दिशेने अत्यंत वेगाने आलेल्या एका अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दीपक डोक्याच्या भारावर उसळून रस्त्यावर आदळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या बाजूलाच असलेल्या पत्नी या अपघातातून थोडक्यात बचावल्या, मात्र पतीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्या घटनास्थळीच कोलमडून गेल्या.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु संधी साधून पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच दीपक यांचे मोठे भाऊ नरेश आणि सोहम यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दीपक तिवाडे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ११ वीत शिकणारी मुलगी आणि ७ वीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. घराचा आधारस्तंभ अचानक गेल्याने तिवाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वरठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वरठीचे ठाणेदार निलेश गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, त्या माध्यमातून फरार पिकअप वाहनाचा आणि चालकाचा शोध घेतला जात आहे.



