
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घटना; दुकानदाराच्या धाडसी प्रतिकारामुळे आरोपी पळाला, व्यापारी वर्गात खळबळ
गडचिरोली : शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या राम मंदिर परिसरातील ‘स्वागत प्रोव्हिजन स्टोअर्स’मध्ये भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, २५ जून रोजी दुपारी घडली. विशेष म्हणजे, ही थरारक घटना शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर घडल्याने संपूर्ण व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुकान मालकाने दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे मोठी जीवितहानी आणि दरोड्याचा कट टळला आहे.
सविस्तर वृत्त असे की, स्वागत प्रोव्हिजन स्टोअर्सचे संचालक गुरुवारी नेहमीप्रमाणे दुकानात कार्यरत होते. दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास तोंडाला दुपट्टा बांधलेला एक संशयित युवक दुकानाबाहेर मोबाईल पाहत घुटमळत होता. दुपारी ठीक १ वाजता, दुकानात कोणीही ग्राहक नसल्याची संधी साधून तो आत शिरला. त्याने आपल्या जवळील पिशवीतून धारदार चाकूसारखे शस्त्र काढले आणि थेट काउंटरवर बसलेल्या संचालकांच्या गळ्याला लावले. त्याने काउंटरमधील रोख रक्कम काढून देण्याची धमकी देत लुटमारीचा प्रयत्न केला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून न जाता दुकान संचालकाने कमालीचे प्रसंगावधान राखले. त्यांनी तत्परतेने त्या आरोपीच्या चेहऱ्यावरील दुपट्टा खेचण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांमध्ये दुकानातच जोरदार झटापट झाली. या झटापटीदरम्यान चाकू लागल्याने संचालकाच्या गळ्यावर किरकोळ खरचटले व दुखापत झाली. व्यापारी आपल्यावर भारी पडत असल्याचे आणि पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने तिथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये आरोपीची संपूर्ण हालचाल कैद झाली आहे. दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार: आरोपी हा सडपातळ बांध्याचा, अंदाजे साडेपाच फूट उंच आणि २५ ते ३० वयोगटातील आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या-हिरव्या रंगाच्या उभ्या पट्ट्यांचा पूर्ण बाह्यांचा शर्ट, काळसर रंगाची पॅन्ट आणि काळा गॉगल घातला होता. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तुलनेने शांत असलेल्या गडचिरोली शहरात मुख्य बाजारपेठेत भरदिवसा अशी घटना घडल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. “शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध वेगाने सुरू असून त्याला लवकरच बेड्या ठोकू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मुख्य बाजारपेठेत दिवसाही गस्त वाढवावी, अशी आग्रही मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे.



