
₹४.९५ कोटींच्या प्रकल्पात ‘नैसर्गिक शेततळी-आधारित शेती प्रणाली‘वर भर ; गाळ काढण्याचे काम यशस्वी
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम एटापल्ली तालुक्यात महत्त्वाकांक्षी ‘एकात्मिक उपजीविका विकास’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बायफ (BAIF) डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प एसबीआय फाउंडेशनने पुरस्कृत केला आहे. याचा थेट फायदा एटापल्लीतील १५०० कुटुंबांना मिळणार आहे.
हा प्रकल्प १ एप्रिल २०२५ पासून पुढील ३ वर्षांसाठी सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ₹४.९५ कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे. एटापल्ली तालुक्यातील २० गावांना लक्ष्य करून, सुमारे १,५०० कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. हवामान-अनुकूल शेतीला प्रोत्साहन देणे, उपजीविका सुधारणे आणि समुदायाची समृद्धी वाढवणे हे या उपक्रमाचे मूळ केंद्र आहे.
या प्रकल्पात ‘नैसर्गिक शेततळी-आधारित शेती प्रणाली’ या अभिनव संकल्पनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. हा मॉडेल ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध करतो: एकात्मिक दृष्टिकोन: यामध्ये शेततळीत मासेपालन केले जाते. दुसरा टप्पा: शेततळ्याच्या वर कुक्कुटपालन करून कोंबड्यांचे खत माशांसाठी नैसर्गिक खाद्य म्हणून वापरले जाते.पाण्याचा वापर: त्याच पाण्याचा उपयोग नजीकच्या पिकांना सिंचनासाठी केला जातो, ज्यामुळे पाण्याची कार्यक्षम बचत होते.
प्रकल्पाच्या पहिल्या वर्षासाठी ५०० कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच, जलसंधारण वाढवण्यासाठी १५ बोडींमधील (नैसर्गिक शेततळी) गाळ काढण्याचे कामही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. सन २०२७-२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, १,५०० कुटुंबांना शाश्वत आर्थिक आधार मिळणार आहे.



