
विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ; ९६ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी तर ३९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान
गडचिरोली : “गोंडवाना विद्यापीठ म्हणजे गडचिरोलीसारख्या निसर्गसमृद्ध भागातील एक ‘नव तपोवन’ आहे. हे विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता गोंडी, माडिया भाषा संवर्धन आणि बांबू संशोधनासारख्या उपक्रमांतून समाज मन घडविण्याचे काम करत आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या नवनिर्मित सांस्कृतिक सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते.
डॉ. अभय बंग यांनी आपल्या भाषणात युवकांना मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की, “भारताचे भवितव्य घडविण्याची ताकद आजच्या युवा पिढीत असून ती एक ‘सुपर पॉवर’ आहे. केवळ नोकरीच्या मागे न लागता युवकांनी स्वतः रोजगार निर्माते बनावे. नव्या जगाचे आकलन करून, सृजनशीलता आणि सहृदयता अंगी बाणवून केवळ अर्थप्राप्तीसाठी न जगता ‘अर्थपूर्ण’ जीवन जगले पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “विद्यापीठ आपल्या गावात, एकल प्रकल्प, स्पार्क आणि वीर बाबुराव शेडमाके यांसारख्या योजनांमधून विद्यापीठ आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध करत आहे. अडपल्ली येथील १७० एकर जागेवर लवकरच विद्यापीठाचा देखणा परिसर साकारला जाईल, जे देशातील एक आदर्श विद्यापीठ ठरेल.”
या दीक्षांत समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला: सर्वाधिक सुवर्णपदके: वाणिज्य विद्याशाखेतील वैष्णवी संजय थेरकर (ब्रह्मपुरी) आणि विज्ञान विद्याशाखेतील जादा रबिया रियाज (नागभीड) यांनी प्रत्येकी ३ सुवर्णपदके पटकावून विद्यापीठात अव्वल स्थान मिळवले. आचार्य पदवी: एकूण ९६ संशोधकांना ‘आचार्य’ (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. (मानव विज्ञान- ४३, विज्ञान व तंत्रज्ञान- ३४, वाणिज्य- १५, आंतरविद्याशाखीय- ०४). पदके: एकूण ३९ विद्यार्थ्यांना सुवर्ण, तर रजत, इंद्रधनुष्य आणि अश्वमेध अशी एकूण ४३ पदके वितरित करण्यात आली.
समारंभाला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. मनोज डायगव्हाणे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अपर्णा भाके व प्रा. सविता गोविंदवार यांनी केले, तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.



