क्राईमभंडाराविदर्भ

सहायक महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

भंडारा : येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेला आणि सध्या भंडारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेला सहायक महसूल अधिकारी सुनील होमराज लोहारे (वय ४५) याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून चक्क उपविभागीय कार्यालयातच लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे केसलवाडा (तालुका भंडारा) येथे प्लॉट आहे. त्यातील काही क्षेत्रफळाच्या प्लॉटची सन २०१७ मध्ये विक्री करण्यात आली होती. त्यावेळी चुकीमुळे तक्रारदाराच्या पत्नीचे नाव सातबारावरून कमी करण्यात आले व अन्य व्यक्तीचे नाव चढविण्यात आले. चुकीने वगळण्यात आलेल्या पत्नीच्या नावाची नोंद सातबारावर होण्याकरिता त्यांनी २४ फेब्रुवारीला केसलवाडा येथील तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. तो पुढील कार्यवाहीसाठी तलाठी कार्यालयातून उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्या अर्जावर दुरुस्तीसंदर्भातील आदेश घेऊन सातबाऱ्यावर योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी सुनील लोहारे याने तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या तक्रारीची ११ एप्रिलला पडताळणी केली असता मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरून, मंगळवारी सापळा रचून सुनील लोहारे याला रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार त्याने कार्यालयातच पंचासमक्ष लाच स्वीकारली. याच क्षणी पथकाने त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया आणि पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button