
मुलगी गर्भवती झाल्यामुळे प्रकरण उघडकीस
भंडारा : एका अल्पवयीन मुलीचा लपून बालविवाह करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्यामुळे हा गुन्हा समोर आला. करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांनी मुलीचे आई-वडील, अल्पवयीन पती आणि त्याचे आई-वडील अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
साकोली तालुक्यातील खांबा (जांभळी) येथील रहिवासी प्रकाश शालिकराम शेंद्रे आणि त्यांच्या पत्नीने त्यांचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे लग्न एका अल्पवयीन मुलीसोबत लावून दिले. विशेष म्हणजे, ही पीडित मुलगी गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी ही मुलगी गर्भवती राहिली आणि ती सात महिन्यांची गर्भवती असताना हा बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुलीच्या आई-वडिलांसह तिच्या अल्पवयीन पती आणि त्याचे आई-वडील अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांचेही लग्नाचे वय नसतानाही दोन्ही कुटुंबांनी हे लग्न लावून दिले. या प्रकरणात पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.



