
चामोर्शी : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चामोर्शी शहरात ४ ते १० डिसेंबर दरम्यान श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील त्यांचा वाढदिवस आध्यात्मिक आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.
या ज्ञानयज्ञ सप्ताहात प्रसिद्ध प्रवचनकार परम पूजनीय विनोद बिहारी गोस्वामी महाराज यांच्या ओजस्वी, प्रेरणादायी आणि भक्तिमय वाणीतून भागवत कथेचे पारायण होणार आहे. या भक्तिमय कार्यक्रमात नागरिक आणि भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
डॉ. देवराव होळी यांनी आध्यात्मिकतेसोबतच सेवाकार्यालाही विशेष स्थान दिले आहे. या अनुषंगाने दोन महत्त्वाचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. ८ डिसेंबर रोजी मेडिकल कॉलेज गडचिरोलीच्या नेत्रतज्ञ डॉ. देवश्री होळी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून, युवकांसह सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजकारणात सक्रिय असतानाही डॉ. देवराव होळी यांनी सदैव सेवाभावी वृत्ती जपली आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेला बळकटी देत, आध्यात्मिकतेच्या माध्यमातून समाजाला एक अनोखा संदेश दिला आहे. भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करणारे आदिवासी समाजातील ते एकमेव व्यक्ती ठरले आहेत.
आयोजकांनी चामोर्शी नगरीतील सर्व नागरिकांना या भागवत कथा पारायणाचा तसेच आरोग्यविषयक शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ४ ते १० डिसेंबरपर्यंत चामोर्शी नगरी भक्ती, सेवा आणि समरसतेने नटणार आहे.



