
नियोजन बैठकीत महत्त्वाचे निर्णय ; दोन काटे आणि शासकीय गोदामातून होणार मका खरेदी
कुरखेडा : तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता, मका खरेदी केंद्र सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत नुकतीच एक महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मका खरेदीसाठी दिवसांचे नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
तालुक्यातील विविध केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी आणि प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आठवड्यातील दिवसांचे वाटप करण्यात आले आहे: कुरखेडा आविका केंद्रावर सोमवार आणि मंगळवार, गोठणगाव आविका केंद्रावर बुधवार आणि गुरुवार, कढोली केंद्रावर शुक्रवार आणि गेवर्धा केंद्रावर शनिवार या दिवशी मका विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सर्व खरेदी कुरखेडा येथील पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात केली जाणार असून, कामाला गती देण्यासाठी तिथे दोन वजन काटे लावण्यात येणार आहेत.
यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी मका खरेदीसंदर्भात महत्त्वाच्या मागण्या मांडल्या: गोदाम व्यवस्था: मका साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. बारदाना उपलब्धता: खरेदीदरम्यान बारदान्याचा तुटवडा भासू नये याची काळजी घ्यावी. लक्षांक आणि केंद्रात वाढ: तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड झाली असल्याने खरेदीचा लक्षांक वाढवावा आणि केंद्रांची संख्याही वाढवावी. त्वरीत चुकारे: विक्री झालेल्या मकाची त्वरित हुंडी काढून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.
या बैठकीला कुरखेडा उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर, प्रभारी तहसीलदार शशिकांत जाधव, नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबारे, संचालक गोपाल उईके, यशवंत चौरीकर, आविका कुरखेडा अध्यक्ष बाबुराव तुलावी, जिल्हा सहकारी बोर्ड अध्यक्ष वसंतराव मेश्राम, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद खुणे, हेमंत शेंद्रे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी वैशाली होले-मरसकोल्हे व इतर मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड झाली असून शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत होते. आदिवासी विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा आविका संस्थेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील पहिले मका केंद्र सुरू केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.



