
गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेली यात्रा यंदाही ‘तंबाखू आणि दारूमुक्त’ करण्यात यश आले आहे. मुक्तीपथ, प्रशासन आणि देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल २.८४ लाख रुपये किमतीचा तंबाखू व दारूसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
मार्कंडा देव येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रेत दारू व तंबाखूमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडून धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग होऊ नये याकरिता दारू व तंबाखुमुक्त यात्रेचा नारा देण्यात आला. या उत्तम प्रतिसाद देत काही दुकानदारांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद ठेवली होती तसेच विक्रीचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्यात आली. यात्रेदरम्यान भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅली, पोस्टर्स आणि घोषणांचा प्रभावी वापर करण्यात आला. व्यसनाधीनतेचे घातक परिणाम दर्शवण्यासाठी तंबाखू व दारूची काढण्यात आलेली ‘प्रेत यात्रा’ भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. तसेच व्यसनाचे दुष्परिणाम दर्शविणारे मुखवटे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. दारू आणि तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. या मोहिमेत सुमारे २,२०,००० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ आणि ६४,००० रुपयांची दारू, असा एकूण २.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून २,२०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दारू विक्री करणाऱ्या ४ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस विभाग, देवस्थान समिती, सरपंच संगीता मोगरे, उपसरपंच जुनघरे, पोलिस पाटील आभारे, राजू मोगरे, शालू उंदिरवाडे, तंटामुक्तीचे मुखरूजी शेंडे, मुक्तिपथचे तुषार येलमल, उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक आनंद इंगळे, आनंद सिडाम, विनोद पांडे, गाव संघटन युवा, शक्तीपथच्या महिला, स्पार्क कार्यकर्ते, देवतळे कॉलेजचे स्वयंसेवक आणि शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. बसस्थानक परिसरात सर्व विभागांच्या उपस्थितीत या मोहिमेची सांगता करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्कंडा यात्रा व्यसनमुक्त ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि मुक्तीपथने चोख भूमिका बजावली. यामुळे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार न घडता भाविकांना सुखाचा दर्शनाचा लाभ घेता आला.



