
६ संशयित रुग्ण आढळले
गोंदिया : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबवण्यात आलेल्या मोफत मोबाइल कर्करोग तपासणी व्हॅन उपक्रमाचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. याच उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (३० ऑगस्ट) तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ईंदोरा येथे आयोजित कर्करोग तपासणी शिबिरात एकूण १११ नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली. यात ६ संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे या उद्देशाने ही विशेष व्हॅन २१ ऑगस्टपासून गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील ३३ आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ही व्हॅन मोफत तपासणी शिबिरे घेत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हॅनमध्ये एका दिवसात १०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता आहे.
गोंदिया तालुक्यातील शिबिरे संपल्यानंतर ३० ऑगस्टपासून व्हॅन तिरोडा तालुक्यात दाखल झाली आहे. १ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बेरडीपार आणि २ सप्टेंबर रोजी सुकडी/डाक येथे तपासणी शिबिरे होणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.
ईंदोरा येथील शिबिरात ११९ नागरिकांची तपासणी झाली, ज्यात ७० मुख कर्करोगासाठी, ३२ महिलांची गर्भाशय कर्करोगासाठी आणि ९ महिलांची स्तन कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य दुबे यांनी ही माहिती दिली. या व्हॅनमध्ये ए.सी. तपासणी कक्ष, मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र उपलब्ध आहे.
या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सविता लोणेर, मुखरोग तज्ज्ञ डॉ. अनिल आटे आणि शल्यचिकित्सक डॉ. तुषार डहाके यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. तपासणीनंतर ६ संशयित रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य चत्रभुज बिसेन आणि पंचायत समिती सदस्य हुपराज जमईवार यांनी शिबिराला भेट देऊन अधिकाधिक नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य दुबे व डॉ. रुपेश झोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. आरोग्य विभाग, आशा सेविका आणि नागरिकांच्या सहभागामुळे हे अभियान यशस्वी होत आहे.



